लॉकडाउनचा काळ मुलांसाठी कंटाळवाणा ठरू नये म्हणून एक नावीन्यपूर्ण कल्पना पुढे आली. सुरुवातीला आपल्या घरातल्या मुलांपासून सुरू झालेली ही अॅक्टिव्हिटी कित्येक मुलांपर्यंत पोहोचली आणि त्यातून मनोरंजनासोबतच बौद्धिक विकासही झाला.
शुभांगी साळवी
२२ मार्चपासून भारतात लॉकडाउन सुरू झाले. मारूतीच्या शेपटीप्रमाणे लॉकडाउन वाढतच गेला. प्रत्येकजण आपापल्या परीने हा लॉकडाउनचा काळ सुसह्य करण्याचा प्रयत्न करत होता. घराच्या बाहेर पडायचे नाही, शॉपिंग नाही, हॉटेलिंग नाही, मित्रमंडळी, नातलग यांना भेटायचे नाही… मुळात आउटिंगच करायचे नाही. फक्त आणि फक्त घरातच राहायचे. या नवीन विचाराशी सर्वांनाच जुळवून घ्यायला लागले, किंबहुना तो विचार कृतीतही आणावा लागला. हळूहळू त्याची सवयही होत गेली. मोठ्यांच्या मानाने लहानांनी हा बदल खूपच सामंजस्याने घेतला, असे म्हणावे लागेल.
याच काळात आपण लहान मुलांसाठी काय करू शकतो, असा विचार मनात आला, कारण आता दिवसभर मुले घरातच राहणार होती. त्यांना नेमके कशात आणि कसे गुंतवून ठेवायचे, हा पालकांसमोरचा मोठा प्रश्न आणि यातूनच मग ‘लॉकडाउन अॅक्टिव्हिटी‘ असा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार झाला. यामध्ये मी मोबाइलच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ग्रुपवर रोज सकाळी ११ वाजता मी एखादी अॅक्टिव्हिटी पोस्ट करत असे, ती करण्यासाठी मुलांकडे संध्याकाळच्या ४ वाजेपर्यंतचा वेळ दिला. मुलांनी ती अॅक्टिव्हिटी ‘ऑफ लाइन’ करणे अपेक्षित होते. मग मला ती वैयक्तिकरित्या व्हॉट्स अॅप करत असत.
(व्यायामप्रेमींना फटका, जिमसाठी ‘कोव्हिड प्रीमियम शुल्क’ भरावा लागण्याची शक्यता)
खरे सांगायचे, तर सर्वांत आधी हा उपक्रम मी माझ्या भाच्यांसाठी सुरू केला. त्यांना तो खूप आवडायला लागला. काहीतरी वेगळे आणि वेगळा विचार करून कृती करण्यात त्यांना आनंद वाटत होता. साधारण आठवडाभराने माझा भाऊ संतोष चिवेलकरच्या मनात आले, की हा उपक्रम आपण मोठ्या प्रमाणात राबवला तर? मलाही त्याचे म्हणणे पटले.



