Home>>शेती>>अतिवृष्टिग्रस्तांना मदत
शेती

अतिवृष्टिग्रस्तांना मदत


दोन हजार २९७ कोटी वितरित करण्याचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी): जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या हप्त्यापोटी २ हजार २९७ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश सोमवारी (ता.९) काढण्यात आले. शेती आणि घरांसाठी एकूण ५ हजार ५०० कोटींची मदत देण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागांत अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ऐन काढणीवर आलेली पिके भुईसपाट झाली होती. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारने १० हजार
कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये शेतपिकांचे झालेले नुकसान, खरडून गेलेली
जमीन, पडलेली घरे, रस्ते, विजेचे पडलेले खांब या सर्व बाबींसाठी ही मदत देण्यात येत आहे.

जून ते ऑक्टोबर २०२० या काळात एकूण ४१ लाख हेक्‍टर जमीन अतिवृष्टी, पुराने बाधित झाली आहे. या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी जिरायत, बागायत जमिनीसाठी ६,८०० प्रति हेक्टर आणि फळपिकांसाठी १८,००० रूपये प्रति हेक्‍टर इतकी केंद्राची मदत देय आहे, ही मदत अपुरी असल्याने राज्य सरकारने कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्‍टरी १० हजार रुपयांची
मदत जाहीर केली आहे. ही मदत दोन हेक्‍टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे. म्हणजे ५ एकर
शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल. अतिवृष्टीमुळे
फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागांसाठी प्रति हेक्‍टरी २५
हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दोन हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादेत ही सुद्धा
मदत मिळणार आहे. तसेच मृत व्यक्‍तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर
‘पडझडीसाठीही भरीव मदत देण्यात येणार आहे.

ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल, असे ठाकरे यांनी घोषित केले होते.
त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत वितरित करण्यात आली आहे. तसेच सोमवारपासून
(ता.९) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात करण्यात
आल्याचे सांगण्यात आले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  • 0
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *