Chagan Bhujbal : मुंबईत थंडी नसते; नागपुरात ती असते; पण अनुभव असा आहे की अनेक अधिवेशनात ऐन थंडीतही राजकीय घटनांमुळे गरमागरमी झाली
विधिमंडळाचं नागपूर अधिवेशन म्हणजे एक पर्वणी असते. यावेळी हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार असं दिसतं. खरं तर नागपूर करारानुसार विधिमंडळाचं तीनपैकी एक अधिवेशन नागपुरात होणं गरजेचं आहे; पण यावेळी कोरोना सगळेच करार मोडत आहे. अधिवेशन नागपुरात होणार नसेल तर त्या मोबदल्यात उद्धवजींनी नागपूर/विदर्भाला एक पॅकेज तरी दिलं पाहिजे. नागपूर अधिवेशन म्हणजे हुर्डा पार्टी असं पूर्वी म्हणायचे. गुलाबी थंडीत दोन-तीन आठवडे नागपूरला जायचं, मज्जा करायची.
मुंबईत थंडी नसते; नागपुरात ती असते; पण अनुभव असा आहे की अनेक अधिवेशनात ऐन थंडीतही राजकीय घटनांमुळे गरमागरमी झाली. शिवसेनेचे तत्कालीन दिग्गज नेते छगन भुजबळ यांचं बंड त्यातीलच एक. १९९०चा काळ होता. भुजबळ आणि त्यांच्या समर्थक आमदारांना नागपूरचे दत्ता मेघे यांच्या फार्महाऊसवर, खासगी कंपनीच्या गेस्टहाऊसवर लपतछपत ठेवलं होतं. प्रचंड टेन्शन होतं. खामगाव येथील लोकमतच्या कुळकर्णी नावाच्या वार्ताहरानं सर्वात आधी ही बातमी फोडली. शिवसेनेनं इन्कार केला; पण अखेर भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाच. बाळासाहेबांनी मनात कटुता ठेवली नाही. नंतर १९९५ मध्ये ते नागपुरात आले तेव्हा लोकमतचे संस्थापक बाबूजी जवाहरलाल दर्डा यांची त्यांनी घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती.
अधिवेशनादरम्यान, २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात निघालेल्या गोवारी समाजाच्या प्रचंड मोर्चात चेंगराचेंगरी झाली अन् ११४ बळी गेले. तिथून राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. १९९५ मध्ये युतीचं सरकार आलं. नागपूरचं अधिवेशन म्हणजे आठवणींचा दीर्घपट. १९८२ मध्ये काँग्रेसचे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. विधानभवन परिसरातील इमारतीच्या पहिल्या माळ्यावर काँग्रेसच्या कार्यालयात आमदारांची बैठक झाली. त्यात बाबासाहेबांवर टीकेचा प्रचंड भडिमार झाला. काँग्रेसच्या आमदारांनी एवढा शाब्दीक हल्ला चढवला की ते चपला घेऊन खाली आले. ते त्यांच्या दालनात निघून गेले. पत्रकारांनी लगेच त्यांना गाठलं. आपल्याविरुद्ध बंड करू पाहणाऱ्या नेत्यांना बाबासाहेबांनी सुनावलं, ‘ही भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची अन् कृती षंढाची आहे’. ते वाक्य चांगलंच गाजलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. ‘माझं माजी मुख्यमंत्रिपद हे पद तर कोणी काढून घेऊ शकत नाही ना?’, ही बाबासाहेबांची मिश्कील टिप्पणीही तेवढीच गाजली.



